ऑनलाइन लोकमत
शेगाव, (जि.बुलडाणा) दि. 12 - लोहारा-शेगाव रस्त्यावर गुरूवारी ९ वाजताच्या सुमारास वाटमारीची घटना घडली. यामध्ये निंबा फाटा येथील दोन व्यापारी गंभीर जखमी झाले असून दोघांनाही अकोला येथे हलविण्यात आले.
गुरुवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास निंबा फाटा येथील किराणा व्यावसायीक मनोज हिरालाल राठी आणि आशिष नंदलाल राठी दोघे रा. शेगाव हे मोटारसायकलने निंबा फाटा येथून शेगावकडे परत येत असताना लोहारा गावाजवळील पुलाजवळ अज्ञात इसमांनी त्यांना दांडा मारून खाली पाडले. यानंतर लाठ्या-काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या राठी बंधुंना उचलण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. २० मिनीटानंतर निंबा फाटा येथून शेगावकडे जाणारे योगेश इंगळे, गणेश जाधव, संजय देशमुख यांनी रस्त्याच्या बाजुने पडलेले दिसल्याने त्यांनी थांबुन जखमींना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात हलविले. यामधील मनोज राठी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने दोघांवर प्रथमोपचारानंतर अकोला येथील रूग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बावीस्कर, राजु चौधरी, अरूण खुटाफळे यांनी घटनास्थळ गाठले. मात्र सदर घटनास्थळ हे उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने याबाबतची माहिती उरळ पोलिसांना देण्यात आली.
वाटमारी करणारे चार ते पाच इसम असून त्यांनी लाकडी दांडा मारून खाली पाडल्याची माहिती आशिष राठी यांनी लोकमतशी बोलतांना दिली. घटना घडल्यानंतर एक तासानंतर उरळचे ठाणेदार पवार हे घटनास्थळावर पोहचून त्यांनी पंचनामा केला. वाटमारी होत असताना आमचे शेगाव शहर प्रतिनिधी फहीम देशमुख हे याच मार्गाने लोहाराकडे जात असताना यात ते सुदैवाने बचावले. त्यांनी या घटनेची माहिती सर्वप्रथम शेगाव आणि उरळ पोलिसांना दिली. (शहर प्रतिनिधी)