सचिन जवळकोटे सातारा : दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा ‘नॅशनल हायवे क्रमांक चार’ सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला गेला आहे. पुणे, कोल्हापूर, धारवाड अन् आता बंगळुरू या चार शहरांंत गोळ्या झाडून झालेल्या हत्या पाहता ‘हायवे’शी संबंधित हा योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात पाठीमागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दाभोलकर हे मूळचे साता-याचे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या सातारा शहरातील नागरिकांना चार वर्षांनंतरही दाभोलकर हत्येच्या वेदना लपविता आलेल्या नाहीत. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचीही सकाळी फिरायला गेल्यानंतर गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच कोल्हापूर शहर आहे. धारवाड येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही गोळ्या झाडूनच खून करण्यात आला. धारवाड हे शहरही पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच वसले आहे. बंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांचीही गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. पुण्यातून निघालेला नॅशनल हायवे क्रमांक चार बंगळुरूमध्ये संपतो.
शहरं रक्ताळली... एनएच ४ डागाळला! योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 4:09 AM