- अ. पां. देशपांडेमुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आणि तरीही रोजीरोटीसाठी मुंबईत रोज इतर राज्यांतून येणाºया लोकांची आवक चालूच आहे. इतक्या लोकांना सामावून घेण्याएवढी घरे, रस्ते, रेल्वे आणि बस वाहतुकीची साधने, पाणी, वीज या स्रोतांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीसारखे अपघात घडून येतात. या शहराचे क्षेत्रफळ मर्यादित आहे. त्यामुळे शहर विस्तारायला भूभाग नसल्याने येथील इमारती आता बहुमजली होत आहेत. पूर्वी त्या चार चार माजली असत आता त्या १२ - १२ मजली होऊ लागल्या आहेत. या शहरातील जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी राहत्या घरांशिवाय आणखी एक किंवा दोन-दोन घरे घेतली असून ती कुलूप लावून बंद ठेवली आहेत. अशा घरांची संख्याच मुळी काही लाखात आहे. भाजीविके, फेरीवाले किरकोळ दुकानदार यांच्या सोयी नीट न केल्याने ते शहरातील मोकळ्या जागांवर ठाण मांडून बसले आहेत. उदा. चर्चगेट स्टेशनजवळील क्र ॉस मैदान झोपडपट्टी आणि फिरस्त्या करमणूकवाल्यांनी व्यापले आहे. या ठिकाणी हे फेरीवाले गर्दी करून आपापला माल विकतात. तेव्हा अशा लोकांसाठी स्वस्तात पण बहुमजली इमारतीत सोय करायला हवी. म्हणजे या जागा परत मोकळ्या झाल्या तर लोकांना श्वास घ्यायला मोकळी जागा लाभेल. यासाठी हवाई दलातील निवृत्त अधिकारी मधू सावंत (आता वय वर्षे ९१) यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी एक योजना महापालिकेकडून मंजूर करून घेतली आहे. ती योजना अशी आहे की, प्रत्येक संस्थेने, शाळेने, सोसायटीने, दुकानदाराने, आपल्या समोरच्या मोकळ्या जागेची माहिती महापालिकेला पुरवावी. त्याचा एक नकाशा महापालिकेला द्यावा. तेथे छोटा बगीचा बनवावा. यासाठी महापालिका एक रुपयाच्या फीमध्ये परवानगी देते. त्यामुळे येथे आक्रमण होणार नाही आणि महापालिकेला हवी तेव्हा ती जागा ताब्यात घेता येईल.मुंबईचा २0१४ - ३४ या काळाचा विकास आराखडा तयार असून तो आता शासनाच्या मंजुरीअधीन आहे. त्यावर वास्तुशिल्पी आणि नगर नियोजन महाविद्यालयात शिकणाºया मुलांकडून सूचना मागवण्याचा उपक्रम मुंबई महानगरपालिका आणि आॅपरेशन रिसर्च फाउंडेशनने केला. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद आला असून त्यातील बक्षीसपात्र सूचनांचा एक अहवाल तयार झाला आहे. तो सायली उदास मंकीकर आणि प्राची मर्चंट या दोघींनी संपादित केला. त्या सूचनातील एक सूचना अशी आहे की, लंडन, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड या ठिकाणी घरे रिकामी ठेवल्यास त्यावर दंड बसतो. तशी पद्धत मुंबईत आणावी, जेणेकरून लाखावर रिकामी घरे भाड्याने दिली जातील. यामुळे शहरातील झोपडपट्टी काही प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. शहरे सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेली करण्यासाठी त्या त्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन, नाटक - सिनेमा - क्रीडा - आर्टगॅलरी - तरण तलाव अशा सोयी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला हव्यात. या गोष्टी मुंबईत झाल्या तर भविष्यात त्या पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद येथेही करता येतील.(संदर्भ - इनोव्हेटिव्ह आयडियाज फ्रॉम स्टुडंट्स आॅन मुंबई मेकओव्हर )
मुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात, मूलभूत स्रोतांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 5:55 AM