नागपूर: जामिया विद्यापीठात झालेल्या घटनांची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं विधान देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहिदांचा अपमान असल्याचं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. जामिया विद्यापीठात दिलेल्या घोषणांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी दोन ट्विट करत घोषणांचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. 'जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणं हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचं उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावं', अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधताना सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये विद्यार्थी आझादीच्या घोषणा देताना दिसत आहेत. 'अशाशा आंदोलनांना प्रोत्साहन देणं यावरून तडजोडीची किती मोठी परिसीमा तुम्ही गाठली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,' असा हल्लाबोल फडणवीसांनी दुसऱ्या ट्विटमधून केला आहे. या ट्विटसोबतही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जामिया विद्यापीठातल्या परिस्थितीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. देशात आणि राज्यात अस्थिरतेचं, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातं. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का, याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला. ज्या देशातील युवक बिथरतो, तो देश स्थिर राहू शकत नाही. युवक देशाची शक्ती आहे. भावी आधारस्तंभ आहेत. युवकाला बिथरवू नका असं आवाहन त्यांनी केलं.