मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. तसेच या कायद्याला पाठिंबा देणाऱ्या मोर्चाचे आयोजन करण्यास परवानगी नाकारणाऱ्या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा घणाघाती सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाकडून आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ऑगस्ट क्रांती मैदानावरच सभा आयोजित करण्यात आली. या सभेवेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.
''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. आज या राज्यातील सरकारने आम्हाला मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. मात्र दंगे, जाळपोळ करणाऱ्यांना परवानगी दिली जाते. मात्र आम्हाला परवानगी नाकारली गेली. परवानगी नाकारणाऱ्या या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?'' असा घणाघाती सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेवरही त्यांनी टीका केली. सत्तेच्या लालसेने शिवसेनेला मुकेबहिरे बनवले असा टोला त्यांनी लगावला.