मुंबई: देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सुरु झालेल्या आंदोलनाने भाजपची डोकेदुखी वाढली असताना, आता भाजपमधुनच या कायद्याला विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विधेयक रद्द न झाल्यास सांगलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे दिलेल्या इशाऱ्यानंतर, आता बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाजपच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी नागरिकत्व कायद्याला विरोधकरत सामुदायिक राजीनामे दिले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायदा (कॅय) व एन.आर.सी. या चुकीच्या व संविधानाच्या विरोधातील बील पास केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या माजलगाव शहर व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी सामुदायिक राजीनामे तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांच्याकडे दिले. परंतु तालुकाध्यक्षांनी राजीनामे न स्वीकारल्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राजीनाम्याची होळी करून भाजपाच्या निषेधाची घोषणाबाजी केली.
माजलगाव शहर व तालुक्यातील अनेक मुस्लिम समाजातील कार्यकर्ते हे निष्ठेने पक्षाचे काम करत होते. परंतु पक्षाची धोरणे ही मुस्लिम विरोधी आहे की काय जसे केंद्र सरकारने तीन तलाक, लव जिहाद, धारा ३७०, घर वापसी अन आता नागरिकत्व सुधारणा विधेयक बील (कॅब) व एन.आर.सी. या चुकीच्या व संविधान विरोधी निर्णय लादून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे काम होत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. तर भाजपच्या या निर्णयांच्या निषेधार्थ माजलगाव भाजपातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांच्याकडे सामुदायिक राजीनामे दिले.
तसेच भाजपचे केंद्रीय नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे कितीही जोरदार समर्थन करीत असले तरी आसाममध्ये सुद्धा भाजपचे काही नेते व आमदार या कायद्यावर नाराज आहेत. जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.