मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदललेल्या भूमिकेवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. काल शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला. शिवसेनेनं लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधेयकाबद्दल स्पष्टता आवश्यक असल्याचं म्हटलं. सरकारनं विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यसभेत विधेयकाला विरोध करू, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यावर फडणवीसांनी जोरदार टीका केली. शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मात्र आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात आहे. काँग्रेसचा दबाव आल्यानं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं भूमिका बदलली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आपली जुनी भूमिका बदलणार नाही, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मात्र अद्याप त्यांनी खातेवाटप केलेलं नाही. त्यावरुनही फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केलं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं अद्याप खातेवाटपच केलेलं नाही. अशा परिस्थितीत उत्तरं कोण देणार, असा सवाल त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागणीचं पुढे काहीच झालेलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
Citizen Amendment Bill: काँग्रेसचा दबाव आल्यानं शिवसेना संभ्रमात?; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 6:52 PM