लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक भागातील निवासी क्षेत्रात शाळा आरक्षणाच्या भूखंडात कचरा प्रकल्प उभारण्यास स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी विरोध केला आहे . आज रविवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी जमून पालिकेचा निषेध करण्यात आला .
मीरा भाईंदर महापालिकेने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीत बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या जवळील शाळेसाठी असलेल्या आरक्षण क्र. २१९ मध्ये कचरा प्रकल्प उभारण्याचा ठेका दिला आहे . त्यासाठी सदर आरक्षणाच्या जागेत कचरा प्रकल्प उभारण्याचे काम पालिका सुरु करणार आहे . याची माहिती स्थानिक नगरसेवक व नागरिकांना मिळताच त्यांनी ह्या विरोधात तक्रारी करून कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध सुरु केला आहे . स्थानिक शिवसेना नगरसेविका तारा घरत व स्नेहा पांडे , नगरसेवक जयंतीलाल पाटील , दिवंगत नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांच्या पत्नी पूजा आदींनी कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध करणाऱ्या तक्रारी महापालिकेस दिल्या आहेत .
आज रविवारी नागरिक आणि नगरसेवकांनी निषेध फेरी काढून आरक्षणाच्या जागेत जमून कचरा प्रकल्पास विरोध केला . सदर परिसर हा दाट लोकवस्तीचा असून भर नागरी वसाहतीत कचरा प्रकल्प उभारल्यास रहिवाश्याना कायमचा दुर्गंधी , घाणीचे साम्राज्य सहन करावे लागेल व लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनेल . महापालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाच्या पर्यावरण विभागासह आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत . शाळेचे आरक्षण असताना शाळा उभारणे आवश्यक असून त्याठिकाणी कचरा प्रकल्प उभारणे बेकायदेशीर आहे . आरक्षणात बदल करता येत नसून नागरिकांना येथे माफक दरात शिक्षण देणाऱ्या शाळेची गरज असल्याचे येथील नागरिक व नगरसेवकांचे म्हणणे आहे .
महापालिकेने बळजबरी कचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा जन आंदोलन उभे राहील व त्याची जबाबदारी हि महापालिकेची असेल असा इशारा स्थानिक रहिवाशी व सेनेच्या नगरसेवकांसह सेनेचे पूजा आमगावकर, शैलेश पांडे , पवन घरत , संकेत गुरव, अजय नाईक आदींनी दिला आहे . नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध पाहता पालिकेचा भर वस्तीतील आरक्षणाच्या जागेतला कचरा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे .