पालघर : जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयामध्ये फ्लॅट, गाळे आदीचे दस्तनोंदणीची सवलत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. मात्र, या तारखेला दस्तनोंदणीचे शुल्क भरून पुढील चार महिने कधीही दस्तनोंदणी करता येणार असल्याची मुभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नितीन पिंपळे यांनी जाहीर केली आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात आपला फ्लॅट, व्यावसायिक गाळे आदींची दस्तनोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनावाढीला आमंत्रण मिळत असल्याने ग्रामीण व शहरी भागासाठी विषयी बाब म्हणून जिल्हा निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना ही सवलत देण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत डिसेंबरपर्यंत दस्तनोंदणीसाठी मुद्रांक शुल्कमध्ये तीन टक्के सवलत घोषित केली होती. या सवलतीचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतलेला आहे, तसेच जानेवारी ते मार्चअखेर मुद्रांक शुल्क कमी केले असून, ३१ मार्चपर्यंत शहरी भागांमध्ये चार टक्के मुद्रांक शुल्क व नोंदणी फी अशी पाच टक्के इतकी आहे. ही सवलत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली असली तरी या तारखेला दस्त कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ तारखेपर्यंत ऑनलाइन अथवा इतर प्रकाराने दस्तनोंदणी शुल्क भरल्यास चार महिन्यांत केव्हाही दस्तनोंदणी पक्षकारांना करता येणार असल्याची सवलत देण्यात आली असल्याचे नितीन पिंपळे यांनी कळविले आहे.
उपनिबंधक कार्यालये आज सुरू२७ मार्चला शासकीय सुटी असली तरी पालघर, बोईसरसह वसई तालुक्यातील सहा. उपनिबंधक तथा मुद्रांक कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पिंपळे यांनी केले आहे.