पुणे : शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात खास निधीची तरतूद करण्यात येते. परंतु यंदा नागरिकांच्या बजेटला आयुक्तांनी मोठा कट लावला आहे. सन २०१७-१८ अंदाजपत्रकात यासाठी केवळ आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडून नागरिकांच्या सहभागाला खो घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहराच्या विकासामध्ये नागरिकांच्या थेट सहभागासाठी गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांचे बजेट हा खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध लहान-मोठी कामे सुचविल्यावर महापालिकेच्या वतीने यासाठी दर वर्षी निधीची तरतूद करून ही कामे केली जातात. यासाठी नागरिकांकडून कामांची यादी मागविली जाते, त्यावर या कामांची निवड करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली असते. ही समिती कामे अंतिम करून त्यावर खर्च टाकला जातो. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु महापालिकेच्या कामातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांचे बजेट यासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात येत आहे.प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांचा गेल्या काही वर्षांत ‘नागरिकांचे बजेट’ अंतर्गत मोठा सहभाग होता. परंतु यंदा याच मध्यवर्ती भागातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या बजेटसाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. यामध्ये औंध, घोले रोड, ढोले पाटील, नगर रोड, टिळक रोड, भवानी पेठ, सहकारनगर आणि कसबा पेठे, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांचे बजेटमध्ये या क्षेत्रीय कार्यालयांतील नागरिकांच्या कामांसाठी निधीची तरतूद नाही. सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकात आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांच्या कामांसाठी केवळ ८ कोटी ४ लाखांची तरतूद केली आहे. त्यामध्ये १४ क्षेत्रीय कार्यालयांतील केवळ ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामांसाठीच ही तरतूद आहे. गतवर्षीच्या (२०१६-१७) आयुक्तांच्या अंदाजपत्रकात १० कोटी ३९ लाखांची तरतूद होती. तर २०१४-१५ च्या अंदाजपत्रकात तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद होती. त्यात ७६ प्रभागांमधील रस्ते, ड्रेनेज, विद्युत अशा विविध कामांचा समावेश होता.
नागरिकांच्या बजेटला कट
By admin | Published: April 04, 2017 1:04 AM