डोंबिवली : भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून मागे वळून कधीच पाहिले नाही. डोंबिवलीकरांच्या प्रेमामुळे मंत्रीपद मिळाले आहे. संधी द्या, असे मला कधीही सांगावे लागले नाही. अनेकजण इथवर पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. पण, मी मात्र तसे कधीच केले नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा मेसेज जेव्हा आला, तेव्हा माझ्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले, अशा शब्दांत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या. ब्राह्मण सभा डोंबिवली, कौटिल्य नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांच्यातर्फे राज्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार सोहळा ब्राह्मण सभागृहात आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त मंडळाचे डॉ. उल्हास कोल्हटकर, प्रतिभा बिवलकर, कौटिल्य पतसंस्थेचे रामचंद्र वैद्य, कार्याध्यक्ष वसंत पळसुले आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, पदभार स्वीकारण्यापूर्वी कोकण किनारपट्टीचा दौरा करून आलो. तेथे बंदरासोबत क्लस्टरच्या माध्यमातून विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. माझ्याकडे देण्यात आलेली खाती दुर्लक्षित असल्याने काम करण्याची चांगली संधी आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान व अन्नखाते यात वेगळ्या पद्धतीने काम करीन. कल्याण-डोंबिवलीत मेडिकल कॉलेज उभारण्याबाबत प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी आश्वस्त केले.राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून अप्पा चक्रदेव, आबासाहेब पटवारी ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत. जेव्हा ‘डोंबिवलीकर’ मासिक सुरू केले, त्यावेळी या मंडळींनी त्याला राजकारणाचा वास येऊ देऊ नकोस, असे सांगितले होते. डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी आहे. ही चळवळ आता मोठी होऊ लागली आहे. या शहराने मला भरूभरून दिले, मोठे केले. डोंबिवलीचे नाव महाराष्ट्रात उंचावल्याशिवाय राहणार नाही. मी भरल्या पोटाचा माणूस आहे, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात मी तुम्हाला फार वेळ देऊ शकणार नाही. तेव्हा नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्न मला एसएमएस करावेत. ते वाचून मी स्वत: संबंधित व्यक्तीशी संपर्क क रून ते सोडवण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. कोल्हटकर म्हणाले की वैद्यकीय, शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची खाती चव्हाण यांच्याकडे आहेत. ब्राह्मण सभेच्या बाजूला असलेले सूतिकागृह बंद पडले आहे. ते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करावे. ठाणे जिल्ह्यात राजीव गांधी हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत एखादे महाविद्यालय व्हावे तसेच टास्क कोर्स सुरू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
नागरिकांच्या प्रेमामुळे मंत्रीपद मिळाले - चव्हाण
By admin | Published: July 21, 2016 4:03 AM