नरेश म्हस्के प्रवक्ते, शिंदेसेनाखासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत असले, तरी नागरिक तुमच्यासोबत नाहीत, असा अपप्रचार केला जात आहे. परंतु, जे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले आहेत, ते नागरिकांच्या विश्वासावरच आले आहेत. त्यामुळे अपप्रचाराचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. देशाच्या विकासासाठी मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, देशाची अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, विकासाची कामे करायची आहेत, म्हणूनच आम्ही महायुतीत आहोत.
मुंबईत सहा मतदारसंघ आहेत, त्यातील तीन शिंदेसेनेला मिळतील, तर तीन मतदारसंघांत भाजप लढेल. या सहा मतदारसंघांतून विकासाची कामे नागरिकांपर्यंत नेण्याचे काम केले जात आहे. मतदार याद्यांवर काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी १० शिवदूतांची नेमणूक केली आहे. मुंबई ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी काही दिवसांत उमेदवाराची घोषणा होईल. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे ठाण्यावर कोणी दावा केला, तर त्यात गैर काहीच नाही. परंतु, जो कोणी उमेदवार असेल, तो महायुतीचा असेल. आम्ही तर मोदी हेच आमचे उमेदवार आहेत, असे समजतो. ठाणे जिल्हा शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ठाण्यासह इतर आजूबाजूच्या शहरांचा विकास होत असून, ठाणे हे राहण्यायोग्य शहर असल्याने या शहराला प्राधान्य दिले जात आहे.
यापूर्वीही शिवसेनेची होती, यापुढेही शिवसेनेचीच राहणार आहे. 'गद्दारी विरुद्ध निष्ठावंत' अशी टीका केली जाते, परंतु बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली? ज्या काँग्रेसने नेहमी सावरकरांचा तिरस्कार केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले आहे?, महायुतीचा धर्म कोणी मोडला?, हिंदुत्वाचे विचार बाजूलाकोणी सारले?, ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे. मात्र, त्याच काँग्रेसबरोबर जवळीक कोणी साधली?, स्वार्थासाठी हिंदुत्वाला तिलांजली देत मुख्यमंत्रीपद कोणी मिळविले?, त्यामुळे गद्दार व निष्ठावंत कोण, हे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले. बंद प्रकल्प सुरू केले. मुंबई, ठाणे जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने झाली आहेत. रस्त्यांची कामे, मेट्रो, कोस्टल रोड, सौंदर्गीकरणाची कामे आदींसह वाहतूककोंडी सोडविण्यावर भर दिला आहे.