ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला आहे. मात्र, गावातील पर्यायी रस्त्यावर भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याने जीवघेणे वळण घेऊन गावकऱ्यांची कसरत सुरू आहे.
दोन वर्षांच्या इतिहासात रस्त्याची कासवगतीने प्रगती सुरू आहे. गावकऱ्यांचा कुठलाही विचार पूल बनवताना ठेवला नसल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा आग्रह धरून कामात खोडा निर्माण केला होता. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत बैठक घेऊन रास्त मागणीवर विचार करण्यात आला. रखडलेल्या स्लॅबचे काम अखेर सुरू झाले. गत आठवड्यापूर्वी पावसाने ग्रामस्थांची पुन्हा दळणवळणाची कोंडी निर्माण झाली होती. पुलावर लोंबकळणाऱ्या तारांना विद्युत वितरणने हटविल्याने पुलावर मुरूम, दगडाचा चुरा टाकून ग्रामस्थांना व भारत बटालियनला रस्ता सुरू करून दिला. मात्र शुक्रवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे पुन्हा दलदल होऊन वाहन चालविताना अत्यंत कसरत करावी लागत आहे.
भिंतीचे बांधकाम सुरू...
पर्यायी रस्त्यावर सिमेंट भिंत बांधण्याचे काम सुरू केले असून, तेथून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहास रोखणार कसे असा सवालही उपस्थित केला जात आहे. पर्यायी पुलाचे काम त्वरित करावे, स्कूल बसला तर अत्यंत धोकादायक अवस्थेतून जावे लागत आहे, अशी स्थानिक पालकांची ओरड आहे. नागरिकांना वेठीस धरू नका ...
गावातील नागरिकांना वेठीस धरू नका कारण आजारी नागरिकांना रुग्णालयात नेताना रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. वयोवृद्ध महिला व शाळकरी मुलांची चिंता वाढली असल्याची खंत भाजपचे जमील पटेल यांचे म्हणणे आहे.