मुंबई : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आढावा घेण्यासाठी टी. एस. आर. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने सध्या पर्यावरणात होत असलेल्या बदलांविषयी जनतेची तसेच तज्ज्ञांची मते मागविली आहेत.व्यक्तिगत पातळीवर तसेच प्रशासकीय स्वयंसेवी संस्थांनाही या विषयांवर निवेदन सादर करता येणार आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन खात्याशी संबंधित संसदीय स्थायी समिती नियुक्त करण्यात आली असून, त्याचे प्रमुख राज्यसभेचे सदस्य अश्वनी कुमार आहेत. या विषयावर येणाऱ्या सूचना, निवेदने यांचा आढावा घेतल्यावर अहवाल सादर करणार आहे. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये कृषी आणि सामाजिक वनीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक लाभांश देण्याची योजना आहे. ज्या भूप्रदेशात वनराजी उजाड झाली आहे, अशा ठिकाणी वनीकरणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. वन्यजीव व्यवस्थापन योजना अनिवार्य करावे, त्यामध्येच वन्यजीव संरक्षण कायद्याचा अंतर्भाव करावा. केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरण (नेमा) व राज्यपातळीवर राज्य पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरण (सेमा) निर्माण करावे , अशा अनेक सूचना अहवालात आहेत. (प्रतिनिधी)
पर्यावरणाविषयी घेणार नागरिक, तज्ज्ञांच्या सूचना
By admin | Published: December 22, 2014 3:29 AM