मुंबई : राज्यातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी तीन महिन्यांत स्थापन करण्यात येणार असून, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा अहमदनगर ते बीड हा टप्पा मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा या भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पाकरिता उर्वरित भूमिअधिग्रहण जुलै २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणून महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी स्थापन करण्याबाबत रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मात्र, कंपनीची प्रत्यक्ष स्थापना करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात रेल्वेकडून हयगय होत होती. त्यामुळे अखेरीस मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले. बडनेरा येथील वॅगन रिपेअर वर्कशॉप मार्च २०१८ पर्यंत पूर्ण केले जाईल. जळगाव दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्प मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जळगाव-भुसावळ तिहेरी मार्गाकरिता भूमिअधिग्रहण यांचा समावेश आहे. मुंबईत जानेवारीत वातानुकूलित लोकल - मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवण्याचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर जानेवारी २०१६ पासून वातानुकूलित लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
नगर-बीड रेल्वेमार्ग मार्च २०१९ पर्यंत पूर्ण
By admin | Published: September 18, 2015 2:27 AM