अहमदनगर : नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले. तसेच वीजवाहक तारा तुटल्यामुळे सोमवारची रात्र शहरवासीयांना अंधारात काढावी लागली. युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महावितरणने मंगळवारी काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत केला. सोमवारी रात्री पावसाने वादळी वार्यासह शहराला झोडपून काढले. त्याआधी प्रचंड वादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यातील काही वीजवाहक तारांवर पडल्याने अनेक ठिकाणचे खांब कोलमडले. तसेच तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नुकसान मोठे असल्याने शहरातील अनेक भागांत रात्रभर वीज नव्हती.अकरा केव्ही क्षमतेच्या नालेगाव उपकेंद्राला पुरवठा करणार्या वीजवाहक तारांवर मोठे लिंबाचे झाड कोसळल्याने उच्चदाबाचे ५ खांब जमिनीवर आले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली. त्या उपकेंद्राच्या अखत्यारित येणार्या लालटाकी, दिल्लीगेट, सिव्हील एक्स्प्रेस या फिडरवरील सर्व वीजपुरवठा तातडीने खंडित झाला. तसेच शहरांतर्गत व उपनगरांत उच्चदाबाचे एकूण १० व लघुदाबाचे ४२ खांब पडल्याने मोठा परिसर रात्रभर अंधारात होता.
नगरला वादळी तडाखा ५० खांब पडले, वीजवाहक तारा तुटल्या
By admin | Published: June 11, 2014 12:16 AM