अहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपात दाखल झाले. भाजपाच्या या काव्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे.शिवसेनेने लक्ष्य केलेले व खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे भानुदास कोतकर यांच्या समर्थक उमेदवारांना भाजपाने प्रवेश दिला. केडगावमध्ये एप्रिलमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. त्यानंतर कोतकर व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची दहशत असल्याचा आरोप केला होता.केडगावमध्ये आठपैकी सहा जागा काँग्रेसकडे होत्या. मात्र काँग्रेसच्या सुनील कोतकर, मनोज कोतकर, गणेश सातपुते, सुनीता कांबळे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्यामुळे काँग्रेसला ऐनवेळी नवीन उमेदवार द्यावे लागले. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे आहेत. भाजपाचे आमदार व कोतकर-जगताप यांचे व्याही शिवाजी कर्डिले यांनी हे बंड घडविल्याचे समजते. महापालिकेच्या ६८ जागांसाठी ७५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मतदान ९ डिसेंबरला आहे.
नगरमध्ये काँग्रेसचे पाचही उमेदवार ऐनवेळी भाजपामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:11 AM