अकोला : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रक्कम लाटण्यासाठी गोरेगाव येथील इसमावर केलेल्या शस्त्रक्रियेत हेराफेरी करणार्या सिटी हॉस्पिटलला जीवनदायी आरोग्य योजनेतून निलंबित करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे लॉग इन तातडीने बाद करण्यात आले असून, शस्त्रक्रिया करणारे डॉ. अतुल महाशब्दे व डॉ. उमेश गडपाल यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. मीना लोचणी यांनी केली आहे. तत्पूर्वी पांडुरंग वाघ यांना उत्कृष्ट दर्जाचे उपचार देण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.एखाद्या रूग्णालयाला जीवनदायी योजनेतून बाद करण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ (५२) यांना पाठीचा त्रास असल्याने १४ मे रोजी रामदास पेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी प्राथमिक उपचार करून, दुसर्याच दिवशी १५ मे रोजी पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आल्याचे डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले व तसे एक्सरेमध्येसुद्धा दाखवून दिले होते. या शस्त्रक्रियेच्यावेळी वाघ यांच्या पाठीत टाकलेले स्क्रू त्याचवेळी काढण्यात आल्याचे एका दुसर्या डॉक्टरने पुन्हा एमआरआय व एक्सरे काढल्यानंतर समोर आले. त्यानंतर वाघ यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत गौडबंगाल असल्याचे संबंधित डॉक्टरसह रुग्णाच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची विचारणा केली असता, दोन्ही डॉक्टरांनी त्यांना टाळले. जीवनदायी आरोग्य योजनेतून सुमारे ४0 हजारांच्यावर रक्कम मिळविण्याच्या बेतात असलेल्या डॉक्टरांनी वाघ यांच्याकडूनही १५ हजार रुपये घेतले होते. हा प्रकार उघडकीस आणणारे वृत्त दैनिक लोकमतने प्रकाशित केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली. त्यानंतर जीवनदायी आरोग्य योजनेचे मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक यांनी सिटी हॉस्पिटलला जीवनदायी योजनेतून निलंबित करण्याचे आदेश देवून डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिटी हॉस्पिटल जीवनदायी योजनेतून बाद!
By admin | Published: July 06, 2014 7:40 PM