पंकज रोडेकर, ठाणेग्रामीण पोलीस दलातील ७० टक्के गुन्ह्यांचे प्रमाण असलेला मीरा रोड हा विभागाच शहर पोलीस दलात समाविष्ट करून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढण्याबाबत हालचाल सुरू झाल्या आहेत. यामुळे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळांची संख्या सहा होणार असून, पोलीस ठाण्याची संख्या ४० वर जाण्याची शक्यता आहे. मात्र, भविष्यात या आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या ५० वर जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशा पाच परिमंडळांत पसरले आहे. एका परिमंडळात साधारण पाच ते सहा पोलीस ठाणी आहेत. अशाप्रकारे या परिमंडळात ३३ पोलीस ठाणी सध्या सुरू असून दोन पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. तर दोन पोलीस ठाण्याच्या प्रस्तावांची तयार सुरू आहे. विभाजनापूर्वी ठाणे जिल्ह्यात एकूण ३७ पोलीस ठाणी होती. या पोलीस ठाण्यांत वर्षाला जवळपास ७ हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले जातात. यामध्ये जास्तीत जास्त गुन्हे नालासोपारा, विरार, वालीव, माणिकपूर, वाडा, मीरा रोड, भार्इंदर, नवघर, भिवंडी आणि कल्याण तालुका तसेच शहापूर या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. विभाजनामुळे ३७ पोलीस ठाण्यांचे विभाजन झाल्यावर पालघर जिल्ह्यात २२ तर ठाणे जिल्ह्यात १५ पोलीस ठाणी विभागली गेली आहेत. वर्षाला सर्वात जास्त गुन्हे नोंद होणाऱ्या नालासोपारा, विरार, वालीव वाडा आणि माणिकपूर ही पोलीस ठाणी पालघरात तसेच मीरा रोड, भार्इंदर, नवघर, शहापूरही पोलीस ठाणी ठाणे जिल्ह्यात समाविष्ठ केली होती. ठाणे शहर पोलीस दलात मीरा रोड विभाग समाविष्ठ करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, हा विभाग शहरात आल्यावर ठाणे शहर, वागळे इस्टेट अशाप्रकारे परिमंडळांची संख्या तीन होईल. तसेच आयुक्तालयातील परिमंडळांची संख्या सहा होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शहर पोलिसांची हद्द वाढणार
By admin | Published: May 25, 2015 3:38 AM