ठाणे : एकीकडे युतीची बोलणी पुढे सरकत असल्याने आणि भाजपानेदेखील युतीच्या दृष्टीने सकारात्मक पावित्रा घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून शिवसेना आणि भाजपात गेलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. भाजपामध्ये गेलेल्या काहींनी शिवसेनेबरोबर घरोबा नको असल्याचे सांगून तसे फलकही लावले होते. परंतु, तरीसुद्धा त्यांना डावलून युतीची बोलणी सुरु असल्याने त्यातील अनेकांनी पुन्हा स्वगृही येण्याची बोलणी सुरु केली आहे. याला काँग्रेस, राष्ट्रवादीने दुजोरा दिला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा या निवडणुकीतही स्वबळावर लढतील, अशी आशा इतर पक्षातील अनेकांना होती. त्यामुळेच याच मुद्याचा आधार घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपात जाऊन आपले तिकीट पक्के केले. यामध्ये कोपरी, वागळे, घोडबंदर, शहरी भागातील अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही पक्षांच्या बाजूने सध्या सत्तेची वारे वाहत असल्याने आपणही सत्तेचा उपभोग घेऊ याच हेतूने या मंडळींनी हा प्रवेश केला होता. परंतु, आता युतीची बोलणी सुरु झाल्याने त्यांचे फासे त्यांच्यावरच पलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती झाली तर शिवसेनेचे दोन आणि भाजपाचे दोन असे उमेदवार निवडणुकीत येऊ शकतात. तर काही ठिकाणी शिवसेनेचे तीन आणि भाजपाचा एक असेही समीकरण होऊ शकते. त्यामुळेच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून शिवसेना-भाजपामध्ये दाखल झालेल्यांच्या मनातील धडकी वाढली आहे.एकूणच युतीचा फैसला कसा होतो, यावरच काहींनी आपले राजकीय भवितव्य ठरविण्यास सुरुवात केली आहे. काहींना तर युती पचनी पडत नसल्याने त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)>दोन्ही पक्षांचे नेते आता बसले अडूनकाहींनी तर त्यानुसार त्या पक्षांच्या नेत्यांबरोबर काहींनी चर्चा सुरु केली आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी वागळे इस्टेट भागातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला मध्यस्थी करुन काँग्रेसमध्ये पुन्हा येण्यासाठी विनंती केल्याची माहिती काँग्रेसच्याच सूत्रांनी दिली. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीतही सुरु आहे. राष्ट्रवादी सोडून गेलेले काही नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्यासाठी चर्चा करीत आहेत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र आता अडून बसले आहेत. या मंडळींचा निर्णय योग्य वेळीच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
आघाडीचे नगरसेवक पुन्हा स्वगृही येणार?
By admin | Published: January 19, 2017 4:00 AM