विलास गावंडे, यवतमाळमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही प्राधिकरणात वर्ग करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातूनच सर्व प्रकारची कामे चालणार आहेत.उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणातील विभागीय कार्यालयाचे नागरी-ग्रामीण विभाग, तांत्रिक विभाग असे विभाजन करण्यात आले़ मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याची उपरती प्राधिकरणला झाली. या विभागासाठी असलेल्यामुख्य अधिकाऱ्यांसाठी वाहन, भत्ते शिवाय कार्यालयाचा दैनंदिन खर्चही वाढला होता. नवीनयोजनांची कामे या विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र विभागाकडे कामेच नसल्याने फारसा उपयोग नव्हता. त्यामुळे हा विभागच बंद करण्याचा निर्णय प्राधिकरणने घेतला. प्राधिकरणच्या वरिष्ठ स्तरावरील बैठकांसाठी जलव्यवस्थापन तसेच नागरी व ग्रामीण विभागाचे अधिकारी उपस्थित राहात होते. दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रवास, भत्ता आदी बाबींचा खर्च प्राधिकरणला झेपत नव्हता. वास्तविक सुरुवातीपासूनच या विभागाकडे वरिष्ठस्तरावरून दुर्लक्ष राहिले. २० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गाडा हाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाबही या विभागाच्या अयशस्वीतेला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे खर्चाचा भार वाढल्याचे कारण पुढे करत नागरी-ग्रामीण विभाग बंद करण्यात आला, तर दुसरीकडे मुख्य अभियंत्यांची सहा विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली.औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे याठिकाणी सदर कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. नागरी व ग्रामीण विभागाचा कर्मचारी वर्ग मुख्य अभियंता कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. सदर कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची वानवा होती. तोकड्या यंत्रणेवर कारभार सुरू होता.
प्राधिकरणचा नागरी ग्रामीण विभाग गुंडाळला!
By admin | Published: May 02, 2015 1:13 AM