वाफगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, वरुडे, वाकळवाडी, गाडकवाडी येथील सर्व वीजधारकांना वीजबिलातील घोळामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे मागील महिन्याचे वीजबिल पुन्हा लावून आल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे.वीजधारकांनी वेळेमध्ये वीजबिलाची रक्कम बँकेमध्ये भरली. परंतु, वेळेवर डीसीआर महावितरणकडे जमा न केल्याने मागील महिन्याचे वीजबिल पुन्हा या महिन्यात वाढीव लागून आले आहे. त्यामुळे वीजधारकांना वीजबिल कमी करून घ्यावे लागत आहे. तसेच, या महिन्यात पुन्हा अशी काही समस्या निर्माण झाली, तर महावितरणच्या नियमानुसार दोन महिने वीजबिल नाही भरले, तर वीजजोड तोडण्यात येईल, या संकटातदेखील काही वीजधारक दिसत आहेत.बँकेची ऑनलाइन प्रक्रिया बंद झाली असल्याने डीसीआर वेळेत पोहोचला नाही व वितरणच्या अधिकार्यांनी दखल न घेतल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. यावर उपाय म्हणून महावितरणचे कर्मचारी सांडभोर साहेब व मांजरे भाऊसाहेब सध्या वाफगावमध्येच वीजबिल कमी करून देत आहेत. त्यामुळे वीजबिलधारकांना वीजबिल कमी करण्यासाठी खेडच्या ऑफिसला जावे लागत नाही. त्यामुळे काही प्रमाणात वीजबिलधारकांचा त्रास कमी झाला आहे.
चुकीच्या वीजबिलांमुळे नागरिक हैराण
By admin | Published: May 07, 2014 8:35 PM