महाड- सावित्री नदीवरील मंगळवारी रात्री कोसळलेला पूल हा सुस्थितीत होता. तसेच हा पूल कमकुवत असल्याचे किंवा कमकुवतपणाचे लक्षण यापूर्वीच्या पाहणीत आढळून आलेले नाही, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. सन १९२८ साली ब्रिटिश काळात हा पूल बांधण्यात आला होता. त्या पुलाची रचना दगडी कमानीच्या बांधकाम स्वरूपाची असल्याची माहिती महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सुरवसे यांनी दिली. या पुलाला ११ मीटर लांबीचे १७ गाळे होते, तर पुलाची लांबी १८० मीटर व रुंदी ६ मीटर होती, असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावरून वाहतूक सुरळीत होती. गेल्या महिन्यापासून सावित्री नदीच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तसेच महाबळेश्वर येथे ४१०.६० मिमी इतका पाऊस झाल्याने सावित्री नदीला पूर आला. या पाण्याच्या अतिवेगाने प्रवाहाच्या दाबाने हा सावित्री पूल वाहून गेल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचा दावा महामार्ग विभागाने केला आहे. मात्र हा दावा हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे.>चालकासह पुत्रही वाहून गेलापुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका बसचे चालक श्रीकांत शामराव कांबळे (५३) हे मूळचे हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी होते. त्यांचा मुलगा महेंद्र (१७) हाही याच बसमधून प्रवास करीत होता. त्यामुळे कांबळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजापूर-बोरीवली बसचे चालक गोरखनाथ सीताराम मुंडे (४५) हे परभणीतील गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली येथील रहिवासी होते. गोरखनाथ चार वर्षांपूर्वी चिपळूण आगारात चालक या पदावर रुजू झाले होते. मुंडे यांच्या नातेवाईकांसह अंतरवेली येथील अनेकांनी महाडकडे धाव घेतली आहे. गोरखनाथ मुंडे यांच्या परिवारात वडील, पत्नी, मुलगा, ३ मुली, दोन जावई, भाऊ, नातू असल्याची माहिती मिळाली.
पूल सुस्थितीत असल्याचा केला होता दावा
By admin | Published: August 04, 2016 5:35 AM