मुंबई – अहमदनगर इथं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला अजब सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, धाब्यावर घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असं विधान बावनकुळेंनी केले. त्यावर टीकेची झोड उठताच आता बावनकुळे यांच्याकडून सारवासारव करण्यात येत आहे.
या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण एवढे चांगले काम करतो, मोदींनी गेल्या ९ वर्षात इतके चांगले काम केले. भारताचे चंद्रयान ३ वैज्ञानिकांनी जागतिक यश मिळवले. देशात महिला आरक्षण लागू झाले तरीही नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांसोबत बसा, त्यांचा सन्मान करा. तुम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला जा, किंवा त्यांना तुमच्याकडे चहाला बोलवा. खरी वस्तूस्थिती त्यांना सांगा. पत्रकार हे समाजातील मोठे स्थान आहे. आपल्या व्यवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना खरे सांगणे, पत्रकारांना समजावून सांगणे काय खरे आहे काय खोटे आहे. पत्रकारांकडून इनपुट घेणे, कारण पत्रकारांकडून समाजातील सत्य समजते. त्यामुळे पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगले वागा असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत ४ बूथ जे पदाधिकाऱ्यांना दिलेत, त्या बूथवर लोकांचे काय म्हणणे आहे, पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचे मत आणि मन बदलू शकतात. शेवटी पत्रकारही एक मतदार आहे. त्याला मत मांडण्याकरता काय अडचण आहे. त्यांच्याशी सापत्न वागणूक कशाला? तुम्ही बोलतच नाही. पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही. समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला. त्यात कुठलेही वाईट वक्तव्ये नव्हते. आता पत्रकार परिषद संपल्यावर तुम्ही चहा घ्यायला चला यात काय वाईट आहे का? त्यामुळे हे चुकीचे आहे असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
काय म्हणाले होते बावनकुळे?
ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या असं बावनकुळेंनी पदाधिकारी बैठकीत म्हटलं.