पुणे - Ajit Pawar on Amol Kolhe ( Marathi News ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात पाहणी दौऱ्यासाठी पोहचले.यावेळी मतदारसंघातील विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला.शिरूरमध्ये आम्ही जो उमेदवार देऊ त्याला निवडून आणून दाखवू असं अजितदादांनी म्हटलं होते.त्यानंतर आजच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या दौऱ्यात अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या चॅलेंजचा आणि आजच्या दौऱ्याशी काहीही संबंध नाही. अधिवेशन काळातच हा दौरा नियोजित होता. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ, मी जे काही सांगितले ते फायनल आहे असं त्यांनी म्हटलं.
पुणे दौऱ्यात अजित पवार काय म्हणाले होते?ज्यावेळी अजित पवार चॅलेंज देतो ते जिंकूनच दाखवतो. निकालानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा.राजकारणात कुणी काय करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु शिरूरची जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार असं अजितदादांनी म्हटलं होते. त्यावर खासदार अमोल कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिले. जेव्हा चांगले काम केले तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. त्यामुळे आज जर त्यांनी विरोधात प्रतिक्रिया दिली असेल तर त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही. ५ वर्षात मतदारसंघातील हजेरीबाबत बोलले असतील तर त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता.त्यावेळी कान धरला असता तर नक्कीच सुधारणा केली असती. आता अजितदादांनी कान धरलाय त्यामुळे यापुढच्या काळात मी सुधारणा करेन. तसेच जनता सुज्ञ असून सत्तेच्या बाजूने राहायचे की, तत्वे, मूल्ये यांना आपण पाठिंबा द्यायचा हे जनता ठरवेल असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवारांनी शिरूरवर भाष्य केल्यानंतर त्यांचे निष्ठावंत विलास लांडे यांनीही उमेदवारीसाठी शड्डू ठोकला. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्याबाबत अजितदादांनी जे सांगितले, राष्ट्रवादीचा खासदार तिथे निवडून येईल. त्यामुळे १०० टक्के तो शब्द खरा ठरणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अजितदादांच्या पाठिशी उभे राहतील. माझी देखील या लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची तयारी आहे असंही माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटलं.