अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये 'जुंपली'; दादांनी ताईंना बोलायला बंदी करण्याचा प्रयत्न केला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 08:03 AM2024-07-21T08:03:35+5:302024-07-21T08:21:09+5:30
Ajit pawar vs Supriya Sule: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आमनेसामने...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीस पवार कुटुंबीयांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या मुख्य आकर्षण होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या बैठकीस पहिल्यांदाच शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार यांच्या बोलण्याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मात्र, निधी वाटपावरून ही बैठक सुप्रिया सुळे यांनीच गाजवली. सुनेत्रा पवार यांनी मात्र, बैठकीला अनुपस्थित राहणे पसंत केले.
जिल्हा नियोजन समितीने शरद पवार यांना निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रण दिले. नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. मात्र, सुनेत्रा पवार या अनुपस्थित राहिल्या. या बैठकीत शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत, नीरा नदीच्या प्रदूषणावरूनही त्यांनी अजित पवार यांना विचारले.
...तर आम्ही उपस्थितच राहत नाही
बैठकीदरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनाच बोलण्याचा अधिकार असल्याचा शासन निर्णय अजित पवार यांनी वाचून दाखवला. त्यावर बोलण्याचा अधिकार नसल्यास आम्ही खासदार म्हणून या बैठकीत वेळ का खर्ची घालावा, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.