औरंगाबाद : भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) सदस्य नोंदणी कार्यक्रमानंतर मंडपाचा बांबू अंगावर पडल्यावरुन शुक्रवारी दुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली़ यात सात जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ जखमींपैकी एकजण एमआयएमचा कार्यकर्ता असल्याची चर्चा झाल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते़ भाजयुमोच्या समर्थनगर शाखेतर्फे विवेकानंद महाविद्यालयाबाहेर मंडप टाकला होता. सकाळपासून तेथे महाविद्यालयीन तरुणांच्या नोंदणीसाठी उपक्रम राबविण्याचा कार्यक्रम भाजयुमोने ठेवला होता. या कार्यक्रमास दुपारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी भेट दिली. मंत्री गेल्यानंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मंडप काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंडपाचा एक बांबू महाविद्यालयातील तरुणास लागल्यामुळे वादाची ठिणगी पडली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. वाद सोडविण्यासाठी आसपासचे नागरिकही धावले. परंतु तोपर्यंत दोन्ही गटांतील सहा ते सात तरुण जखमी झाले होते. घटनेची माहिती कळताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस पथकही तेथे आले. सुभाष मोकारिया या जखमीवर डॉ.हेडगेवार रुग्णालयात, तर वसीम तांबोळी (२२) या कथित एमआयएमच्या कार्यकर्त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
औरंगाबादेत दोन गटांत हाणामारी
By admin | Published: January 17, 2015 5:32 AM