भिवंडी : दहावीची परीक्षा ५ मार्चला सुरू होत आहे. तत्पूर्वी शाळांमधून तोंडी व विज्ञान प्रात्यक्षिकांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आसनक्र मांक नमूद असलेले ओळखपत्र (हॉलतिकीट) देण्यात आले, परंतु या ओळखपत्रावर एका विद्यार्थ्याच्या जन्मठिकाणाची नोंद भिवंडीऐवजी चक्क उत्तर प्रदेश असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धामणकर नाका येथील शेठ ज्युगीलाल पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी भूषण विलास ठाकरे याने आपला परीक्षा अर्ज याच शाळेमधून भरला आहे. त्यास परीक्षा आसनक्र मांक असलेले ओळखपत्र देण्यात आले. त्यावर जन्मठिकाण म्हणून रामवापूर, उत्तर प्रदेश, जिल्हा आंबेडकरनगर अशी नोंद करण्यात आली आहे. या नोंदीमुळे भूषण व त्याचे पालक चकित झाले आहेत. भूषणच्या प्रवेशावेळी भिवंडी जन्मठिकाण असा उल्लेख आहे, अशी माहिती भूषणचे वडील विलास यांनी दिली. याबाबत मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीत शाळेचे प्रशासकीय प्रमुख सुधीर म्हारूळकर यांची भेट घेतली असता, या वर्षी मंडळाने अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जन्मठिकाणाबद्दल माहिती मागवली. आमच्याकडे असलेल्या नोंदीनुसारच माहिती मंडळास कळवण्यात आली, असे म्हारूळकर म्हणाले. भूषण याचे जन्मठिकाण भिवंडी असल्याबाबत आमच्याकडे नोंद आहे. ती आम्ही मंडळास दिली आहे. परंतु मंडळाकडून याबाबत चूक झाली असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. (प्रतिनिधी)
दहावीच्या हॉलतिकिटावर गोंधळ
By admin | Published: February 19, 2017 1:35 AM