ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 13 - कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी आयोजित शिबिरात २५ महिलांवर प्रथमोपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया करावयाची असल्याने त्यांना उपाशी ठेवले; परंतु चोवीस तास उलटूनही डॉक्टर फिरकलेच नाहीत. त्यामुळे महिलांना परतीचा मार्ग धरावा लागला. हा प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी घडला.
येथील ग्रामीण रूग्णालयात प्रत्येक गुरूवारी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे शिबीर घेतले जाते. बुधवारी दुपारीच महिला दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. २५ महिलांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी झाली होती. शस्त्रक्रियेमुळे संध्याकाळपासूनच अन्न बंद करून त्यांना पोट साफ करण्याच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजता सर्जनमार्फत या शस्त्रक्रिया होणार होत्या ; परंतु गुरुवारी रात्रीपर्यंत सर्जन आल्ेच नाहीत. त्यामुळे महिला उपाशीपोटी ताटकळून गेल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने महिलांना अधिकच त्रास झाला. नातेवाईकांनी येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी समाधानकार उत्तर दिले नाही. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. रात्री उशिरापर्यंत डॉक्टर न आल्याने काही रूग्णांनी आपल्या घरची वाट धरली. तर दूरच्या गावाहून आलेल्या काही रुग्णांनी दवाखान्यातच मुक्काम करणे पसंद केले.