मुंबई - महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा धुसफूस निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे सगळ्यांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भविष्यात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. मविआत ज्याच्या सर्वांत जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसारच २०१९ साली मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे गेले होते. अशात जागावाटपाचे सूत्र ठरलेले नसतानाही राष्ट्रवादीने केलेल्या या दाव्यामुळे काँग्रेस व शिवसेना या घटक पक्षांतून नाराजीचा सूर उमटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी काॅंग्रेसनेही असा दावा केला आहे.
त्यासाठी आपण आधी एकत्र बसू… मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, याबाबत काहीही दुमत नाही. अशा प्रकारचे निर्णय भविष्यात घेतले जातील. - संजय राऊत, शिवसेना नेते