गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी दुपारी पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक उडाली. यात पोलिसांनी दोन पुरुष आणि तीन महिला मिळून पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला पोलिसांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर इतर काही नक्षलवादी जंगलात पळून गेले. ठार झालेले नक्षलवादी प्लाटून क्रमांक १५ चे सदस्य असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.