लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. राज्यातील ९ विभागीय मंडळांतून यंदा १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
प्रथमच मेमध्ये दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती. अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले आहे.
गुणपडताळणीसाठी २८ मे पासून करा अर्ज
- गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५ मध्ये गुण सुधारअंतर्गत परीक्षा देता येईल.