ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.23 - शहरातील आदर्श विद्यालयातील इयत्ता दहावीच्या यश शिवहरी उमाळे या हुशार विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने गत सात महिन्यांपासून तो आजारी आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, उपचाराचा खर्च भागविण्यासाठी पैसे जमविण्याकरिता मदतफेरी काढून ‘यश’ च्या वर्गमित्रांची धडपड सुरू आहे.
अकोल्यातील सिंधी कॅम्पस्थित महात्मा फुले नगरातील यश शिवहरी उमाळे आदर्श कॉलनीतील आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. सात महिन्यांपूर्वी ‘यश’ च्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे आजारी असलेल्या ‘यश’वर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शाळेत हुशार असलेल्या ‘यश’च्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्याच्या पालकांसमोर निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर ‘यश’च्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी त्याच्या वर्गातील विद्यार्थी मित्रांनी मदत फेरी काढून पैसे गोळा करण्याची धडपड सुरू केली आहे. आदर्श विद्यालयातील इयत्ता दहावीतील ‘यश’चे वर्गमित्र विविध शासकीय कार्यालयांसह दारोदार फिरुन नागरिकांकडून मदत मागत आहेत. दहावीतील एका विद्यार्थ्याच्या उपचारासाठी त्याच्या वर्गमित्रांनी मदत फेरी काढून पैसे जमविण्याकरिता सुरू केलेल्या धडपडीला सहकार्य करीत नागरिकांकडून आर्थिक मदत दिली जात आहे. मदत फेरीमध्ये जमविलेले पैसे विद्यार्थ्यांकडून ‘यश’ च्या आई-वडिलांना देण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत मागितली मदत!
‘यश’च्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी पैसे जमविण्यासाठी वर्गमित्रांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत मदत फेरी काढून मदत मागितली. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला सहकार्य करीत जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचा-यांनी आर्थिक मदत दिली. आदर्श विद्यालयातील इयत्ता दहावीतील ‘यश’चे वर्गमित्र निशांत शेजव, प्रशिल खंडारे, पंकज राठोड, मोहम्मद जफर, शैलेश सुरवाडे, करण अवचार, प्रथमेश वरोडे, राज तिलोटे, शुभम पठाळे, नेहा वानखडे, दीपिका काळे, पायल बडदिया व इतर विद्यार्थ्यांनी हातात ‘हेल्प बॉक्स’ घेऊन मदत मागितली.
आमचा वर्गमित्र यश उमाळे हुशार आहे. डोक्याला दुखापत झाल्याने तो आजारी असून, उपचार सुरू आहेत; मात्र त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, वर्गमित्राच्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी आम्ही मदत मागत आहोत. मदत फेरीत नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे.
-शुभम पठाळे
वर्गमित्र विद्यार्थी