पिंपरी : स्थायी समिती आणि महापालिका सर्वसाधारण सभेत नालेसफाईचा विषय गाजल्यानंतर महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नालेसफाई तक्रारीची दखल घेतली आहे. आज सकाळी शहरात पाहणी केली. अधिकारी, कर्मचारी, नागरिकांशी संवाद साधला. आठवडाभरात हे काम पूर्ण करा, असे आदेश दिले. पावसाळा तोंडावर असताना नालेसफाई झाल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. निविदा प्रक्रियेत नालेसफाई अडकल्याचे वृत्तही लोकमतने प्रकाशित केले होते. याविषयी आयुक्तांनी दखल घेऊन नालेसफाई करण्याचे आदेश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. आठ दिवसांत नालेसफाई न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यामुळे सर्व प्रभागातील यंत्रणा आज कामाला लागली होती. या कामाची पाहणी आयुक्तांनी आज केली. सकाळी आठपासून त्यांनी विविध ठिकाणांना भेट दिली. फ व इ प्रभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांची पाहणी केली. या वेळी सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे प्रमुख मिनीनाथ दंडवते, मनोज लोणकर, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते, धानोजी शिर्के, मुख्य आरोग्य निरीक्षक प्रभाकर तावरे, संजय कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक महेश आढाव, भीमराव कांबळे, विनोद मारुडा, राजू साबळे, सुधीर वाघमारे, चंद्रकांत रोकडे आदी उपस्थित होते. नगडी गावठाण, प्रभाग क्रमाक ५ जाधववाडी, मोशी, इंद्रायणी नदी येथील स्मशान घाट या ठिकाणांची पाहणी केली. सर्व नाल्यांची साफसफाई करून नाल्याशेजारील राडारोड्याची त्वरित नियोजनबद्ध विल्हेवाट करावी, अशा सूचना दिल्या. तसेच आयुक्तांनी नाल्याशेजारील सोसायट्यांमध्ये असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. परिसराची नियमितपणे स्वच्छता होते किंवा नाही, याची माहिती घेतली. नालेसफाईचे काम सफाई कामगार कसे करतात? तेथील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. नालेसफाईतील त्रुटी आणि नागरिकांच्या तक्रारीविषयी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत चर्चा केली. (प्रतिनिधी)राडारोडा हटवाभारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार या वर्षी २५ टक्के अतिरिक्त पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये असलेला व नाल्यांच्या कडेला असलेला राडारोडा उचलणे, तसेच नाल्यांच्या प्रवाहाला अडचणी आणणाऱ्या विद्युत व पाणीपुरवठा वाहिन्या यांची वेगळी सोय करणे, रोजच्या रोज नदीपात्रावरील जलपर्णी काढून टाकणे, सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवणे, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
आठवड्यात नाले साफ करा
By admin | Published: June 09, 2016 2:07 AM