पंढरपूर : चंद्रभागेच्या अर्थात भीमेच्या उगमापासून ते संगमापर्यंतचे नदीचे पात्र, पंढरपुरातील घाट, नदीला मिळणाऱ्या उपनद्या, ओढे, नाले या साऱ्या गोष्टींचे मॅपिंग करून ‘नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प येत्या चार वर्षांत साकार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.‘नमामि चंद्रभागा’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात बुधवारी पंढरपूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नमामि चंद्रभागा परिषद झाली़ त्याचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रीय जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह आदी मंचावर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्व चांगल्या संस्कृती या नद्यांच्या काठी जन्माला आल्या़ जिथे नद्या कलुषित झाल्या तेथील संस्कृतीही संपली़ त्यामुळे नद्यांचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे संस्कृतीच्या मूळ तत्त्वज्ञानाला आधुनिकतेची जोड देऊन चंद्रभागा निर्मळ व अविरत करण्याचा संकल्प शासनाने सोडला असून, तो येत्या चार वर्षांत पूर्ण करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे.नदीची स्वच्छता आणि पावित्र्य राखणे हे काम केवळ शासन आणि जनतेचे नाही तर ते महाराज मंडळींचे आणि संतांचेही आहे़ त्यामुळे त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केवळ नदीत पोहल्याने आपले पाप धुतले जात नाही तर नदीमध्ये स्नान करताना आपल्या शरीराची घाण नदीत मिसळू नये, याची काळजी घेणे तेच स्नान खऱ्या अर्थाने पवित्र स्नान आहे, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
उगमापासून संगमापर्यंत चंद्रभागा स्वच्छ करणार
By admin | Published: June 02, 2016 2:39 AM