मुंबई : नागरिकांनी स्वच्छतेचे सवयीत रूपांतर केले, तर महाराष्ट्र हे स्वच्छतेबाबत अव्वल राज्य होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्वच्छ नगरपालिकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली. ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’अंतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ ३५ शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी व कोल्हापूर महापालिकेचे महापौर व आयुक्त यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, नगरपालिका संचालनालयाच्या आयुक्त व संचालक (प्रशासन) मीता लोचन उपस्थित होते.स्वच्छ शहरांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ‘अ’ वर्ग नगरपरिषदेस २ कोटी रुपये, ‘ब’ वर्ग नगरपरिषदेसाठी १.५ कोटी रु पये, तर ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी १ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अनुदानातील ३० टक्के निधी पहिल्या टप्प्यात तर उर्वरित रक्कम ६ महिन्यांनी तपासणी केल्यानंतर दिली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक सहाय्य मिळण्याकरिता जर्मन सरकारच्या सहकार्याने ‘जीआयझेड’ या संस्थेसोबत सामंजस्य करार या वेळी करण्यात आला.प्रास्ताविकात नगरविकास सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी १ मे पूर्वी राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त, तर २५ शहरे स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत ५ पेक्षा अधिक नगरपरिषदा हागणदारीमुक्त केल्याबद्दल पुणे विभागाचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
स्वच्छ नगरपालिका कोट्यधीश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 4:25 AM