ठाणे : उन्हाळ्यात उद््भवणारा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन आतापासूनच विहिरी स्वच्छ करण्याची, त्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या. त्यासाठी वर्षभर नियमित काम होईल, असे पाहा. यातून शहराचा पाण्याचा प्रश्न निश्चितच सुटण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे ठाण्यात कोणत्याही कारणासाठी झाडे तोडली गेली, तर त्या बदल्यात झाडेच लावली जावीत. झुडुपे लावू नयेत. तसेच पक्षी, कीटक, पर्यावरणाचा विचार करून देशी झाडेच लावण्याचा निर्णय घ्यावा. खाडीकिनाऱ्यांच्या पर्यावरणाचा विचार करून खारफुटीचीही लागवड करावी, अशा सूचना पर्यावरण अभ्यासक प्रसाद कर्णिक आणि प्रदीप इंदुलकर यांनी केल्या. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनाचे त्यांनी कौतुक केले. पण, सागरी पर्यावरण जपण्यासाठी लवकर सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. माशांना खायला घालणे रोखापर्यावरण अभ्यासक डॉ. प्रसाद कर्णिक म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने ठाण्यातील तलाव ठामपाने चांगले राखले आहे, हे कौतुकास्पद आहे. या तलावांत निर्माल्य टाकले जात नाही. मूर्ती विसर्जन होत नाही. परंतु, काही लोक येथे माशांना खायला टाकतात. त्यांना रोखायला हवे. ठाण्यातील तलाव हे नैसर्गिक आहेत, ते नैसर्गिकच ठेवले पाहिजेत. तलावाभोवती असलेल्या झाडांचा पालापाचोळा त्या तलावात पडतो आणि ते खाद्य माशांना मिळते. ठाण्यात नाले बुजवले गेले. हे पूर्णपणे चुकीचे आहे. वस्तुत: त्यातून पाण्याचा निचरा होतो. ठाण्यात पूर्वी प्रत्येक घरामागे एक विहीर होती. त्यातील ९० टक्के विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. त्या विहिरी जिवंत झरा असलेल्या होत्या. त्या पुनर्जीवित करणे सहज शक्य आहे. सध्या असा प्रयत्न सुरू आहे. पण, त्याचे प्रमाण फार कमी आहे. हे काम मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी प्रोत्साहनपर योजना आखल्या पाहिजेत. बुजलेल्या किंवा बुजवलेल्या विहिरींतून पालिकेने लोकसहभागातून गाळ बाहेर काढावा. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही, अशी सूचना त्यांनी केली.नाल्यांमार्फत खाडीमध्ये मानवी विष्ठा, मलमूत्र अशी घाण येते. त्यावर, महापालिकेने प्रक्रिया करून जैविक खत किंवा वायू तयार करावा. या योजनेला पर्यावरण संस्था, पर्यावरणतज्ज्ञ मदत करतील. तसेच, ज्या ठिकाणी नवीन बांधकाम होत असेल, त्या ठिकाणी किती झाडे लावावीत, याचे प्रमाण ठाणे महापालिकेने ठरवून दिले आहे. परंतु, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. घोडबंदर रोड आणि कळव्याला खाडीचा भरपूर पट्टा आहे. खाजणामध्ये बांधकाम केले, तर त्या भागांत कत्तल केलेली खारफुटी पुन्हा लावली पाहिजे. जसे वृक्ष लावतात, तशी खारफुटीही लावा, असा आग्रह धरत कर्णिक म्हणाले, बरेच मोठे पूल बांधले जात आहेत. त्यांच्या खाली असलेली जागा वाया जाते. जशी सर्व्हिस रोडवर हिरवळ लावण्यात आली आहे, त्याचप्रमाणे या जागेत झाडे किंवा हिरवळ लावता येईल का, याकडे लक्ष द्यावे. शहरात जिथेजिथे शक्य आहे, तिथेतिथे वृक्षलागवड झाली पाहिजे. यामुळे बऱ्याच प्रमाणात हवेचे प्रदूषण कमी होईल. पर्यावरण राखण्यासाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. ठाणे खाडीत सिमेंट काँक्रिटचा कचरा पडलेला आहे. तो साफ केला पाहिजे. जेवढे नाले शहरात आहेत, ते खाड्यांना जोडले आहेत. त्यामुळे नाल्यांतच कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. नाल्यांवर जाळी लावण्यात यावी आणि ती जाळी रोजच्या रोज स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे. थेट कचरा खाडीत येणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सुचवले. मैदानांभोवती झाडे लावापर्यावरणप्रेमी प्रदीप इंदुलकर यांनी देशी झाडांचा मुद्दा उपस्थित केला. रस्त्यावर दोन्ही बाजूंस झाडांच्या लागवडीसाठी योग्य जागा ठेवण्यात यावी. शहरात लावण्यात येणारी झाडे स्थानिक जातींची असावी. जिथेजिथे काँक्रिटचे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर ऊन पडणार नाही, अशा पद्धतीने वृक्षलागवड झाली पाहिजे. कारण, काँक्रिटचे रस्ते लवकर तापतात. अशा रस्त्यांवर २४ तास सावली असली पाहिजे. जिथे मैदाने आहेत, त्या भोवती झाडे लावावी. हरितपट्टे ही खऱ्या अर्थाने हिरवळ असावी. शहरात हिरवळीकडे लक्ष दिले जात नाही. उद्याने आहेत, पण तिथे गवत दिसत नाही. ठाण्यातील झाडांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. २००० सालापासून टप्प्याटप्प्याने हजारो झाडे तोडली. या झाडांच्या बदल्यात कॉस्मेटिक प्लांटेशन करण्यात आले. सुंदर आणि पटकन वाढणारी झाडे लावण्यात आली आणि ही झाडे या हवामानात टिकत नाही, ती पडतात. शहरातील स्थानिक वृक्षसंपत्ती ही नष्ट होत गेली, परदेशी झाडे आली. परराज्यांतील झाडेदेखील हजारोंच्या संख्येने लावण्यात आली. या झाडांमुळे कीटक, प्राणी, पक्षी बदलले. पर्यावरणाच्या दृष्टीने निरुपयोगी आणि शोभिवंत म्हणून झाडे लावण्यात आली. त्यातून मिळणाऱ्या लाकडाच्या हव्यासापोटी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल केली जाते. झाडांवर उगवलेल्या पॅरासाइटकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. कारण, त्यांना त्याच्यात रस नाही. काही झाडांची खोडं क्वचित रंगवलेली आहेत. आपल्याला जसे सनबर्न होते, तसे झाडांच्या खोडांनाही होते. त्यासाठी ही खोडे रंगवणे आवश्यक आहे. शहरातील झाडांची योग्य ती देखभाल केली जात नाही. झाडे पडतात, ती मरतात, याकडे दुर्लक्ष केले जाते. झाडांच्या नावाखाली ट्रान्सप्लांटेशन हा मोठा व्यवसाय सुरू आहे. पण, ती झाडे कोणती, किती वेळ टिकतील, याचा वैज्ञानिक अभ्यास केला जात नाही. यामागे प्रचंड पैशांचा व्यवहार होतो, असा आरोप त्यांनी केला. याआधी किती झाडांचे रिप्लांटेशन केले, याचा लेखाजोखा पालिकेकडे नाही. केवळ २० वर्षांत भयानक पर्यावरणीय बदल झाले. पालिकेकडून अनावश्यक प्रकल्प राबवले जातात आणि यात अनेक वृक्षांची कत्तल होते. ती झाडे वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न पालिकेने करावा. आता नवीन वृक्ष प्राधिकरण समितीत पर्यावरणतज्ज्ञांचा समावेश करावा. (प्रतिनिधी)>माजिवडा, बाळकुम व कोलशेत परिसरात अनेक भव्य गृहसंकुले निर्माण झाली आहेत. ही मोठी गृहसंकुले टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याची गरज आहे. नाल्यांची सफाई ऐनवेळी केली जाते. या नाल्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका आहे. हे लक्षात घेता महापालिकेने नालेसफाईला पावसापूर्वी किमान तीन महिने आधीपासून सुरुवात करावी. लोढा-माजिवडा येथे एक पोलीस चौकी असावी. लोढा लक्झेरिया या संकुलासमोर महापालिकेचे एक उद्यान असून ते अत्यंत वाईट अवस्थेत आहे. ते उद्यान योग्य प्रकारे विकसित करून तेथे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, अशी अपेक्षा आहे. - उल्हास कार्ले, माजिवडानौपाडा परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे झाडे लावली पाहिजे. परंतु, तेथे देशी झाडांची लागवड व्हावी. शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारले पाहिजे. तसेच, त्यांच्यासाठी वाचनालय आणि अभ्यासिका असावी. - रश्मी जोशी, ब्राह्मण सोसायटीनौपाड्यातील एमटीएनएल आॅफिसजवळ असलेला सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तो तातडीने सुरू करावा. अनेक ठिकाणी कचराकुंडी नसल्याने कचरा रस्त्यांवर फेकला जातो. त्यामुळे किमान अंतरांवर कचराकुंडीची सोय असावी. स्टेशन परिसरात होणारी वाहतूककोंडी हा प्रश्न अत्यंत बिकट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर ओरड केली जात असली, तरी त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे किमान आता तरी हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. - शमिका देशपांडे, हिंदू कॉलनी, कर्वे हॉस्पिटल मार्ग
टंचाईवर मात करण्यासाठी विहिरी स्वच्छ करा
By admin | Published: March 07, 2017 3:26 AM