मुंबई : वर्गातील मुलीला आणि तिच्या मित्राला धक्काबुक्की करून मारहाण करणाऱ्या बदलापूरमधील पाच जणांनी नोव्हेंबर महिन्यातील दर रविवारी दोन तास शहर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने या पाचही जणांवरील गुन्हा रद्द केला. या पाचही जणांनी प्रत्येकी ५० हजार रुपये दंड भरण्याचीही तयारी दर्शवली. या पाचही जणांच्या कामावर प्रभाग अधिकाऱ्याला लक्ष ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.हे सर्व आरोपी १९ ते २२ वयोगटातील असल्याने त्यांचे वय आणि करिअर लक्षात घेऊन न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला. मात्र या सर्वांना कुळगावमधील प्रभाग क्रमांक १ दर रविवारी दोन तास स्वच्छ करण्याचा आदेश दिला. तसेच या तरुणांनी त्यांचे काम पूर्ण केल्यास त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही खंडपीठाने प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.२५ सप्टेंबर २०१६ रोजी या मुलांनी त्यांच्या वर्गातील एका मुलीला व तिच्या मित्राला मारहाण केली. आरोपींमधील एका मुलीला संबंधित मुलीचे दुसऱ्या मुलाबरोबर असलेले मैत्रीपूर्ण संबंध मान्य नव्हते. मत्सर आणि आकसेपोटी त्या मुलाने आपल्या चार मित्रांसह मुलीच्या मित्राला मारहाण केली व मुलीला धक्काबुक्की केली. या घटनेबाबत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. तक्रारदार अल्पवयीन असल्याने या मुलांवर आयपीसी व पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेनंतर मुलांच्या पालकांनी एकत्रित बसून हे प्रकरण मिटवले. त्यानंतर या पाचही जणांनी त्यांच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. (प्रतिनिधी)
सफाईच्या आश्वासनानंतर गुन्हा रद्द
By admin | Published: November 02, 2016 5:43 AM