औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. या अभियानाची ‘पोल’खोलण्याचे काम शनिवारी औरंगाबाद महापालिकेने केले. स्वच्छतेच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला महापालिकेकडून चक्क १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. राज्यातील पाचपेक्षा अधिक शहरांमध्ये या पथकाने पाहणी केली. त्यामुळे या अभियानाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शैलेश बंजानिया यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे पथक २० जानेवारी रोजी शहरात दाखल झाले. पहिल्या दिवशी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना अस्वच्छतेवर झापझाप झापले. दुसऱ्या दिवशी तर पथकाने कहरच केला. काही व्यापाऱ्यांना चक्क दंडही आकारला. दिवसभर पाहणी दौरा संपल्यावर मनपा अधिकाऱ्यांकडे प्रथम महागड्या दारूची ‘फर्माईश’ करण्यात आली. २० हजार रुपयांची दारूहवी, असा हट्ट पथकातील सदस्यांनी धरला. महागडे सिगारेट पाकीटही मनपा अधिकाऱ्यांना मागवायला लावले. त्यांचा हा अवतार पाहून मनपा अधिकारी थक्क झाले होते. शनिवारी शैलेश बंजानिया याने शहराला ‘टॉप २०’मध्ये आणण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडे चक्क अडीच लाख रुपयांची मागणी केली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक डॉ. जयश्री कुलकर्णी, घनकचरा सहायक प्रमोद खोब्रागडे यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यांनी मनपा अधिकाऱ्यांमार्फत १ लाख ७० हजारांची लाच दिली. लाच स्वीकारताना शैलेश बंजानिया याला रंगेहाथ पकडण्यात आले. (प्रतिनिधी)
स्वच्छता अभियानावरच प्रश्नचिन्ह!
By admin | Published: January 23, 2017 3:56 AM