मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मुंबईत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले मंडई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, सिनेनिर्माते सुभाष घई, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, उपायुक्त प्रकाश पाटील, साहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चोरे, साहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे, प्रमुख अभियंता अन्सारी उपस्थित होते.यावेळेस बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, की प्रत्येक माणसाच्या अंत:करणात ही स्वच्छता असली पाहिजे; तरच तो बाहेरची स्वच्छता चांगल्याप्रकारे करू शकतो. स्मार्ट सिटीसाठीसुद्धा सर्व प्रकारच्या कार्यासोबत स्वच्छता तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनेसुद्धा स्वच्छतेची शिस्त अंगी बाळगून कचरा संकलन केंद्राशिवाय इतरत्र कचरा टाकणार नाही, अशी शपथ घ्यावी. (प्रतिनिधी)स्वच्छतेत सहभाग...डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि मुंबई पालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सहभाग घेऊन स्वच्छताही केली. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस समाधान व्यक्त केले.लोकसहभागातूनच देश स्वच्छ होईलराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा जास्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी झालेल्या शुभारंभाचा कार्यक्रम हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून, खऱ्या अर्थाने स्वच्छता ही आपणच करणार आहोत. स्वच्छता मोहिमेला मिळालेला लोकसहभाग हा मोठा असून लोकसहभागातून देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस केले.
स्वच्छतेचा संदेश सत्यात आला
By admin | Published: December 14, 2015 2:15 AM