मुंबई : मुलांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर उद्याचा देश सुदृढ घडेल. शाळकरी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ शकते. यासाठीच मुंबईतील समर्पण या स्वयंसेवी संस्थेने ‘शाळा स्वास्थ्य कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी येथील श्री छेडी सिंह आश्रमशाळेतील १६६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या आश्रमशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार अदकर, रेडिओलॉजिस्ट डॉ. तनय शाह आणि डॉ. कौस्तुभ गिरी हे तीन डॉक्टर आरोग्य शिबिरासाठी गेले होते. यावेळी त्यांनी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांची तपासणी केली. या तपासणी शिबिरात पावसाळ््यातील साथीच्या आजाराबरोबरच मुलांमध्ये रक्तघटकांची कमतरता आणि त्वचेचे आजार आढळून आले. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना औषध देण्यात आले आहे. एक महिनाभर नियमित औषध घेतल्यावर पुन्हा विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत औषधांचा फायदा किती झाला हे तपासण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे समर्पण संस्थेचे विश्वस्त डॉ. रुमा भार्गव यांनी सांगितले. जेवणाआधी आणि शौचाला जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुतल्यास संसर्ग टाळणे शक्य आहे. शारीरिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याविषयी डॉ.भार्गव यांनी माहिती दिली. पालेभाज्यांचे महत्त्व समजवून सांगितले. साबणांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन धीरेन दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी गिरवले स्वच्छतेचे धडे
By admin | Published: July 21, 2016 2:33 AM