ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 7 - स्वच्छतेचा जागर तळागळात रुजावा, स्वच्छतेच्या सवयींचा प्रत्येकाने स्वीकार करावा, यासाठी जिल्हा परिषदेने गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे. यासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांना सहभागी करून घेतले आहे. पाणी, स्वच्छता व आरोग्य या विषयावर उत्कृष्ट देखावे, प्रदर्शन व लोकप्रबोधन करणाऱ्या मंडळांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच मुळात लोकप्रबोधनासाठी झाली आहे. काळाच्या ओघात या उत्सवात लोकप्रबोधन मागे पडले असून, अनावश्यक गोष्टींचा विपर्यास यातून होत आहे. या उत्सवातून समाजोपयोगी कार्य घडावे या उद्देशाने जि.प.ने स्वच्छतेचा जागर करण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी गणेश उत्सव मंडळांना सहभागी करून घेतले आहे.
मंडळांना वर्गणीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या रकमेतून ग्रामविकासाची कामे झाल्यास, तळागळात पाणी, स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा किंवा त्याविषयीची जनजागृती केल्यास, एखाद्या मंडळाने वर्गणीतून गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास, खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा होईल. या भूमिकेतून समाजाभिमुक कार्य करणाऱ्या मंडळांची तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित केली आहे.