लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : गेली अनेक वर्षे जीवन प्राधिकरणाने पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई न केल्यामुळे गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तत्काळ फिल्टर हाऊस येथील पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई सुरू केली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा करते. पाऊस जास्त पडल्याने जमिनीची धूप होऊन चिखलमय पाणी माथेरानच्या शार्लोट तलावात जाते तिथून ते पाणी फिल्टर हाऊस येथे टाक्यांमध्ये साठविले जाते. त्याच टाक्यातील गढूळ पाणी जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचते, तसेच गेली कित्येक वर्षे या टाक्या साफ न केल्यामुळे टाक्यांमध्ये चिखल साचला होता त्यामुळे माथेरानकरांना २० दिवस गढूळ पाणी येत होते. अखेर जीवन प्राधिकरणाने या टाक्यांच्या सफाईला प्रारंभ केला आहे. त्यामुळे माथेरानकरांना एक दिवसआड पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येतआहे.पूर्वी आलम आणि वाळूमधून पाणी शुद्ध केले जायचे, परंतु वाळू खराब झाल्यामुळे ते जलशुद्धीकरण क्लोरीनवर केले जात होते, परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याने पुन्हा वाळूमधूनच जल शुद्धीकरण केले जाणार आहे. यासाठी आम्ही गुजरातहून खास वाळू आणली आहे आणि लवकरच त्याचे सुद्धा काम पूर्ण करून माथेरानला शुद्ध पाणीपुरवठा करणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.>माथेरानला जोरदार पावसामुळे तलावामधील चिखलयुक्त पाणी पाइपमध्ये गेल्यामुळे माथेरानकरांना गढूळ पाणी मिळत होते. यासाठी आम्ही सर्व फिल्टर टाक्या सफाई करण्यास सुरु वात केली आहे. एप्रिल व मे महिन्यात टाक्या साफ करू शकत नाही कारण त्यावेळी माथेरानला पर्यटन हंगाम असतो, थोडा पाऊस झाल्यानंतर आम्ही टाक्या साफ करावयास घेतल्या आहेत. त्यासाठी काही दिवस माथेरानकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन फलकाद्वारे माथेरानच्या बाजारपेठेत करण्यात आले आहे.-किरण शानबाग, शाखाधिकारी, माथेरानगढूळ पाण्याची समस्या माथेरानकरांना नवीन नाही, प्रत्येक पावसात सुरु वातीला गढूळ पाणी येते. दरवर्षी पावसाळा संपल्यावर माथेरानमधील जनतेला क्लोरीनची बॉटल मिळायची, परंतु यावेळेला आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून जून महिन्यातच प्रत्येक घरात क्लोरीन बॉटल पोहोच केली आहे, तसेच गढूळ पाण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दोन वेळा पत्रव्यवहार करून नगरपरिषदेमार्फत विचारणा करण्यात आली आहे.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा
माथेरानमधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता
By admin | Published: July 14, 2017 3:19 AM