नामदेव मोरे,
नवी मुंबई-डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेणाऱ्या नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. प्रत्येक वर्षी नालेसफाईचा फक्त देखावा केला जात आहे. ७४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांच्या पात्रात अतिक्रमण होत आहे. झोपड्यांचे बांधकाम सुरु असून, पालिका एकत्रित नाला व्हिजनच्या नावाखाली या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.नवी मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. शहराच्या एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला खाडी आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरावरील पाणी मुख्य नाल्यांमधून खाडीमध्ये मिसळते. शहरातील मुख्य नाले सुरक्षा कवचाची भूमिका पार पाडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये नाल्यांच्या काठावर अतिक्रमण होवू लागले आहे. भराव टाकून पात्र अरुंद केले जात आहे. एमआयडीसीमध्ये मुख्य नाल्यामध्ये डेब्रिज टाकले जात आहे. बोनसरी, इंदिरानगर, खैरणे एमआयडीसी, दिघा व इतर अनेक ठिकाणी मुख्य नाल्याला लागून झोपड्या बांधल्या जात आहेत. शहराच्या सुरक्षेला धोका पोहोचविणाऱ्या या अतिक्रमणाकडे महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.महापालिका प्रत्येक वर्षी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. यामध्ये मुख्य नाल्यांमधील अडथळे दूर करण्याच्या कामांचाही समावेश आहे. फक्त काही ठिकाणी साचलेला गाळ काढला जातो. परंतु मुख्य नाल्याच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत नाल्यातील डेब्रिज काढले जात नाही. अनेक ठिकाणी पात्र अरुंद झालेले आहे. पात्र पुन्हा पूर्ववत करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नाल्यांच्या काठावरील अतिक्रमण हटविले जात नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्च करुन साफसफाई केल्याचे दाखविले जात आहे. जुईनगरजवळील नाल्यातील गाळ कित्येक वर्षांमध्ये काढलेला नाही सानपाडा ते जुईनगरदरम्यान नाल्यातील गाळ काढला नाही तर पाणी रोडवर येण्याची शक्यता आहे. अनेक नाल्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन दहा वर्षांपासून एकत्रित नाला व्हिजन राबविण्याचे आश्वासन देत आहे.जेएनएनयूआरएमअंतर्गत नाला व्हिजन राबविण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही. शहरामधील सर्व नाल्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. महापालिकेकडे शहराची छायाचित्रे आहेत. १२ ते १३ वर्षात कुठे अतिक्रमण झाले, कुठे भराव टाकण्यात आला याचा प्राथमिक अंदाज येवू शकतो. नाल्याच्या काठावर झालेली बांधकामे हटविण्यासाठी तत्काळ कारवाई सुरु केली नाही तर भविष्यात पावसाचे पाणी झोपडपट्टीमध्ये व शहरात जावून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाकडेही दुर्लक्षबोनसरी परिसरामध्ये काही भूमाफियांनी नाल्यामध्ये भराव टाकून झोपड्या व व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम केले होते. याविषयी शिवसेना पदाधिकारी महेश कोठीवाले व इतर रहिवाशांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर एमआयडीसीने कारवाई केली परंतु दोन महिन्यात पुन्हा तिथे अतिक्रमण झाले आहे.