योगेश बिडवई
मुंबई - केंद्र सरकारने १४ सप्टेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी ज्या निर्यातदरांनी त्या दिवसापर्यंत निर्यात करण्याचे त्यांचे कांद्याचे साठे बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केले होते त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.
नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही यामुळे मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. निर्यातबंदीची अधिसूचना प्रसिद्द झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीय सीमाशुल्क मंडळाने (सेंट्रल कस्टम्स बोर्ड) यासंबंधी खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार खुलासा करणारा ई-मेल निर्यात व्यापार महासंचालनालयातील एक उप महासंचालक (निर्यात) नितिश सुरी यांनी कस्टम्स बोर्डास शुक्रवारी पाठविला आहे. त्यात मालाच्या निर्यातीची तारीख कोणती धरावी यासंबंधीच्या नियमाचा हवाला देऊन असे नमूद करण्यात आले की, ज्यावेळी धोरणात केलेला बदल निर्यातदारांना प्रतिकूल असेल तेव्हा हे सुधारित धोरण, ज्यांनी सुधारित अधिसूचना निघण्याच्या तारखेपर्यंत आपला निर्यातीचा माल बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणारी अधिसूचना ज्या तारखेला प्रसिद्ध झाली तोपर्यंत वरीलप्रमाणे बंदरांमध्ये आणून कस्टम्सकडे सुपूर्द केलेला कांदा हा ‘निर्यातीच्या प्रक्रियेत असलेला माल’ ठरत असल्याने अशा कांद्याला ही निर्यातबंदी लागू होणार नाही. त्यामुळे कस्टम्स मंडळाने बंदरांमधील त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना अशा प्रकारे निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या कांद्याच्या निर्यातीस आडकाठी करू नये, असेही विदेश व्यापार संचालनालयाला कळविले आहे.
बंदरांवर अडकलेल्या 35 हजार टन कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा
मुंबईचे जेएनपीटी बंदर, दक्षिणेकडीले बंदरे, नेपाळ व बांगलादेश सीमेवर निर्यातीच्या प्रतिक्षेत असलेला कांदा यामुळे परदेशात पाठविता येणार आहे. मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र तयार असलेला, लोडिंग, पॅकिंग केलेले कंटनेर यामुळे पाठविता येणार आहेत.
100 कोटींचा कांदा
मुंबई बंदरावर 350 कंटेनर सोमवारपासून थांबले आहेत. दक्षिणेत बंदरांवर 100 कंटेनर, सीमेवर सुमारे 200 ट्रक कांदा निर्यातबंदीमुळे अडकला होता. हा सुमारे 35 हजार टन म्हणजे 100 कोटींचा कांदा आहे. तो सर्व निर्यात होतो का, हे पाहावे लागेल.
- अजित शाह, अध्यक्ष, अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना