वसंत भोईर,
वाडा- यावर्षी कमी पाऊस पडला असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता कोकाकोला कंपनीला वैतरणा बंधाऱ्यातून दिले जाणारे पाणी त्वरित बंद करण्यात यावे असा निर्णय एकमताने नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शीतपेये व बाटली बंद पाण्याचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीला दररोज लाखो लिटर्स पाणी लागते. हे पाणी कंपनी वैतरणा नदीवरील बंधाऱ्यावरून उचलते. यासाठी कंपनी पाटबंधारे विभागाला शासनाच्या नियमानुसार रक्कम अदा करते. गेल्या अनेक वषार्पासून कंपनी हे करते आहे. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, विहीरी, कूपनलिका या कोरड्या पडत चालल्या आहेत. त्यामुळे मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवणार असल्याची दाट शक्यता असल्याने कंपनीला दिले जाणारे वैतरणा बंधाऱ्यातील पाणी त्वरित बंद करण्याची मागणी काही पक्ष व सामाजिक संघटनांनी केली होती.