रत्नागिरी : राज्यभरात ब्रिटिशकालीन पुलांच्या रचनातपासणी करण्याचा (स्ट्रक्चरल आॅडिट) विषय गाजत असताना तपासणी करणारे राज्यातील एकमेव निरीक्षण यंत्र रत्नागिरीमध्ये बंद अवस्थेत पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन ३६ पुलांपैकी अनेक पुलांची स्थिती धोकादायक बनली आहे. महाड दुर्घटनेनंतर याबाबतचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटिशकालीन पुलांची रचनातपासणी १५ दिवसांत करण्यात येईल, अशी घोषणा अधिवेशनात केली होती. जुन्या पुलांची रचना तपासणी करण्यासाठी खास प्रकारचे निरीक्षण यंत्र (स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन युनिट) आवश्यक असते. महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी ज्या राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे आहे त्याच्या राज्य विभागाकडे असे निरीक्षण यंत्रच नाही. राज्यातील अंतर्गत रस्त्यांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मात्र असे एक निरीक्षण यंत्र आहे. त्यामुळे हे एकमेव यंत्र नेमके आहे कुठे, याचा शोध घेता बिघडलेले हे निरीक्षण यंत्र रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारीच गेल्या तीन महिन्यांपासून पडून असल्याचे आढळून आले. हे यंत्र दुरुस्ती करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी ५ ते ६ तंत्रज्ञांचा चमू कार्यरत आहे.
पुलांची रचना तपासणी करणारे यंत्रच बंद
By admin | Published: August 12, 2016 4:31 AM