लातूर : मराठवाड्यात पाणी संकट गहिरे झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाचा पाणीपुरवठा पालिकेने १५ दिवसांपासून बंद केला आहे. त्यातच आता मंगळवारी पाण्याअभावी एकही शस्त्रक्रिया होणार नाही. रुग्णालयाने काटकसर करून सोमवारपर्यंत पाणी कसेबसे वापरले. मात्र रुग्णालयात पाणी नसल्याने नियमित शस्त्रक्रिया बंद ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११ साठवण विहिरी आहेत़ त्यात ४ लाख ९७ हजार लीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे़ पाण्याचा काटकसरीने वापर करून ते आठ-दहा दिवस पुरविले जाते़ परंतु २१ जानेवारीपासून पाणीपुरवठा झालेला नाही़ त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा साठा संपला. येथील रुग्णालयात जिल्ह्यातून तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटकातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. दररोज हजार रुग्णांची तपासणी येथे होते. सुमारे शंभर रुग्ण रोज अॅडमिट होतात़ रुग्णालयातील १७ शस्त्रक्रियागृहात रोज ५० ते ६० छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होतात़ पाणीच नसल्याने मंगळवारी या रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया होणार नाही. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जातील, असे प्रशासनाने सांगितले. महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांची भेट घेतली.
पाण्याअभावी लातुरातील शस्त्रक्रियागृह बंद
By admin | Published: February 02, 2016 4:10 AM