मुंबई, दि. 3 - 9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतील डबेवाले सहभागी होणार आहेत. डबेवाला गेली १२६ वर्ष मुंबईत काम करतो, पण काम बंद करून तो कधी धरणे, बंद, आंदोलने, मागण्या, मोर्चे यामध्ये सहभागी झाला नाही. पण मुंबईत मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टला निघणार आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी वेळ प्रसंगी कामबंद करून सहभागी होण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे. डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे,उल्हास मुके माजी अध्यक्ष यमनाजी घुले, सोपान मरे,बबनदादा वाळंज यांचे मार्गदर्शना खाली मुंबईचे डबेवाले मोर्चात सहभागी होतील.अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, स्वामिनाथन आयोग लागू करणे, चित्रपट नाटकांमधून मराठा समाजाची बदनामी थांबवणे, मराठा समाजासाठी ईबीसी सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाखाची करणे. व मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करावे या साठी महाराष्ट्रत लाखोंचे मोर्चे निघत आहे. शेवटचा मोर्चा कदाचित मुंबईतील असण्याची शक्यता आहे. हा मोर्चा लक्षणियरित्या जागतिक विक्रम ठरण्याची शक्यता आहे. या मुळे मुंबई आणी परिसरातील मराठा समाज ढवळून निघाला आहे. आम्ही सर्व जाती समान मानतो. मग काही जातीना आरक्षण देऊन पुढे आणले जाते आणी आम्हा मराठ्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवले जाते आहे.प्रगती,विकास,शिक्षण याच्यां संधी आम्हाला नाकारल्या जात आहेत. त्या संधी आम्हा मराठ्यांना मिळण्यासाठी "मराठा आरक्षण" मिळालेच पाहिजे, असे डबेवाल्यांनी स्पष्ट केले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी डबेवाल्यांनी आत्ता पासूनच आखणी सुरू केली आहे. डबेवाले तर मोर्चात सहभागी होतीलच पण सोबत आपले नातेवाईक,सगे सोयरे, आप्त,मित्र परिवार यांना ते मोर्चात सहभागी करतील.आणी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतील. आम्ही डबेवाले सुट्टी जरूर घेतो पण त्या आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी या सारख्या असतात. कारण तेव्हा आम्ही पंढरपुर, आळंदी येथे वारीला जात असतो. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी आंदोलनात सहभागी झालो होतो. पण तो दिवस सुट्टीचा होता. पण मराठा मोर्चा चा दिवस कोणताही असुद्या आम्ही सुट्टी घेऊन या मोर्चात सहभागी होणार. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रात निघत आहे.या मोर्चाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अद्याप पर्यंत एकाही मोर्चाला सामोरे गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना विदेशात जायला वेळ आहे. पण मराठा क्रांती मोर्चाला सामोरे जाण्यासाठी वेळ नाही. हा मोर्चा कोणाविरुद्ध नाही. मोर्चात कोणतीही घोषणाबाजी नाही. मोर्च्याला कोणतेही राजकीय नेतृत्व नाही.असे असताना देखील मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चाला सामोरे जात नाहीत. या मुळे मराठा समाजात रोष आहे व तो रोष वाढतो आहे. डबेवाल्यांचे ही मुंख्यमंत्र्यांना आवाहन आहे की ९ ऑगस्टच्या मराठा क्रांती मोर्चाला सामोरे जावे.व मोर्चाच्या ज्या काही मागण्या आहेत. त्या मान्य करून त्याची तड लावावी. असे डबेवाल्यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांचा ९ ऑगस्टला बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 6:17 PM