भोसरी : पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेला तीन दिवसांचा बंद एक दिवस अगोदरच मागे घेण्यात आला. सोमवार, दि. २५पासून २७पर्यंत तीन दिवस बंद पाळण्यात येणार होता. अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवार, दि. २५पासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्लीत झालेल्या देशभरातील सराफांच्या बैठकीत दुकाने बंद न ठेवता सरकारविरोधात कागदोपत्री लढा सुरूच राहणार, असा निर्णय घेण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा यांनी सांगितले.विरोधी पक्षांच्या संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी २५ ते २७ एप्रिल असा तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला होता. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या एक टक्का उत्पादन शुल्कवाढीविरोधात सराफांनी एक मार्चपासून बेमुदत बंद आंदोलन पुकारले होते. तब्बल ४२ दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारच्या आश्वासनामुळे आणि छोटे व्यापारी, नागरिक यांची अडचण लक्षात घेऊन १३ एप्रिलपासून बंद तात्पुरता मागे घेतला होता. रविवारपर्यंत सराफी पेढ्या खुल्या ठेवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी माजी अर्थ सचिव अशोक लहिरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमण्यात आली आहे. ही समिती साठ दिवसांत अहवाल देणार आहे. याबाबत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी विरोधी पक्ष सराफांची बाजू मांडत आहेत. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा त्रास होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.(वार्ताहर)
सराफांचा संप मागे
By admin | Published: April 28, 2016 2:04 AM